स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात इनकमिंग वाढलं असून महाविकास आघाडीतील पक्षगळती कायम असल्याचं चित्र आहे.

Maharashtra Politics: लोकसभेच्या विजयानंतर महायुतीला सोडून महाविकास आघाडीत गेलेले अनेक नेते आता घरवापसी करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील संजय बाबा कोकाटे यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभेनंतर संजय बाबा कोकाटे (Sanjay Baba Kokate) शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले होते. आता पक्षांतर्गत गटबाजीला आणि पक्षसंघटनेतील निष्क्रीयतेला वैतागून संजय कोकाटे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. संजय कोकाटेंच्या सोडचिठ्ठीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखासह काही पदाधिकारी पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात इनकमिंग वाढलं असून महाविकास आघाडीतील पक्षगळती कायम असल्याचं चित्र आहे.
संजय कोकाटेंची शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
लोकसभेच्या विजयानंतर महायुतीला सोडून महाविकास आघाडीत गेलेले अनेक नेते आता परत घर वापसी करू लागले असून सोलापूर जिल्ह्यातील संजय बाबा कोकाटे यांनी शरद पवार गटाचा राजीनामा देत आज शिंदे सेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. संजय बाबा कोकाटे हे लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. यामुळे पवार गटाला माढा विधानसभा जिंकण्यात मोठी मदत झाली होती. मात्र पक्षांतर्गत गटबाजी आणि पक्ष संघटनेतील निष्क्रियतेला वैतागून संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. आज ते मुंबई येथील मुक्तगिरी बंगल्यावर संध्याकाळी सहा वाजता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय कोकाटे यांच्या जाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात असून माढा विधानसभेसह माढा लोकसभेत संजय कोकाटे यांची मोठी ताकद आहे.
सांगलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार
सांगलीत उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून, पक्षाला सांगली जिल्ह्यात खिंडार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशांनी ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे. शिवसेनेतील फुटींनंतर अनेकजण शिंदे गटात प्रवेश करू लागले असून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचे दिसते आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जिल्हाप्रमुख संजय विभूते युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील मिरजेचे शिवसेना नेते श्री सिद्धार्थ जाधव आणि जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश करणार आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख श्री ऋषिकेश पाटील तसेच मिरजेचे नेते श्री सिद्धार्थ जाधव यांच्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात आज अधिकृत प्रवेश करून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत.