राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी इस्त्राईल आणि हमासच्या युद्धावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरुन टीका केली. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटचा मुद्दा खेचला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर मोठा आरोप केला. शरद पवारांनी 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांना पाठिशी घातलं, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच 13 बॉम्बस्फोट मशिदीत झाल्याची खोटी माहिती देवून शरद पवारांनी जनतेची दिशाभूल का केली? असा सवाल नारायण राणे यांनी केला.
“शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. शरद पवार यांनी इस्त्राईल आणि हमास युद्धावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका ही दुर्देवी आहे”, असं नारायण राणे म्हणाले. “दहशतवाद कुणा एका व्यक्ती किंवा देशाविरोधात नसून तो माणुसकीच्या विरोधात असतो ही देशाची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी 20 च्या व्यासपीठावर मांडली आहे. नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भूमिका मांडली. पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवादाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली”, असं नारायण राणे म्हणाले.
“देशाच्या आजवरच्या धोरणाला धरुनच मोदी यांनी वक्तव्य केलं. दहशतवाद विरोधी भूमिका घेणं चुकीचं आहे, असं शरद पवार यांना म्हणायचं आहे का? पॅलेस्टाईन आणि दहशतवादी एकच आहेत, असं शरद पवारांना म्हणायचं आहे का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. शरद पवारांनी आतापर्यंत देशात बरेच मंत्रिपदं भूषविली. ते केंद्रात संरक्षण मंत्री होते. केंद्रीय कृषी मंत्री होते. तसेच महाराष्ट्रात ते चार वेळा मुख्यमंत्री होते”, असं नारायण राणे म्हणाले.
’13 वा बॉम्बस्फोट मशिदीत झाल्याची….’
“मला त्यांना आठवण करुन द्यायचीय, 12 मार्च 1993 ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला. तर 1400 जण जखमी झाले. त्यावेळी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यावेळी 13 वा बॉम्बस्फोट मशिदीत झाल्याची खोटी माहिती देऊन दहशतवाद्यांना वाचवायचा किंवा पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला नव्हता का? तृष्टीकरणाच्या धोरणामुळे देशावर आजवर अनेक संकटं आली. आता तरी शरद पवार तृष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार आहेत का?” असे कडवे सवाल नारायण राणे यांनी केले.
‘आमदार मौलाना जिआऊद्दीन बुखारी यांची हत्या का झाली?’
“शरद पवार यांनी 13 वा बॉम्बस्फोट मशिदीत झाला, अशी खोटी माहिती देवून जनतेची दिशाभूल का केली? ठराविक धर्माच्या लोकांना वाचवण्यासाठी? जे घडलंच नाही, मशिदीत बॉम्बस्फोट ठेवला गेलाच नव्हता. मग तो उल्लेक त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का केला? त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार होते. आमदार मौलाना जिआऊद्दीन बुखारी यांची आपल्या क्रॉफट मार्केटजवळ हत्या झाली. का झाली? हे शरद पवारच सांगू शकतील”, असा मोठा दावा नारायण राणेंनी केला.
‘त्या अहवालात कोणाकोणाची नावे आहेत ते शरद पवारांना माहिती’
“दहशतवाद्याने होरपळलेल्या महाराष्ट्रातील जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत? मार्च 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटानंतर केंद्र सरकारने जुलै 1993 मध्ये त्यावेळचे गृह विभागाचे सचिव एन ए वोरा यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली. या समितीने ऑक्टोबर 1993 मध्ये अहवाल सादर केला. या अहवालात दाऊद इब्राहिम आणि मेमन गँगने देशात अनेक ठिकाणी जाळे पसरवले असून वरिष्ठ अधिकारी आणि राजकारण्यांशी मधूर संबंध प्रस्थापित केला आहे, असा निष्कर्ष काढला होता”, असं नारायण राणे यांनी सांगितलं.
“राजकारणाबरोबर खाजगी विमानातून प्रवास करणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रकरणांची समितीने माहिती घेतलेली होती. वोरा समितीच्या अहवालात कोणाकोणाची नावे आहेत ते शरद पवारांना माहिती आहे. ज्यांची नावे आहेत, त्यांचा दाऊद इब्राहिम आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांशी संबंध होता”, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी केला.