विश्वचषकाची सुरुवात दणक्यात झाली आहे. विश्वचषकात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघही सध्या तुफान फॉर्मात आहे. तीन विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने अशाच पद्धतीने आपली कामगिरी सुरु ठेवली, तर सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित आहे. पण भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी काही सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. टीम इंडियाशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकानेही सेमीफायनलमधील आपली दावेदारी केली आहे.
टीम इंडियाची सुरुवात भन्नाट, सेमीफायनलच्या दिशेने टाकले पाऊल –
टीम इंडियाने सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलच्या दिशेन पाऊल टाकले आहे. भारताने तीनपैकी दोन सामन्यात बलाढ्य संघाचा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा विकेटने हरवले. त्यानंतर पाकिस्तान संघाचा सात विकेटने पराभव केला. तर अफगाणिस्तानविरोधातही विजय मिळवत भारताने आपली दावेदारी मजबूत केली आहे.
सेमीफायनलमध्ये पहोचण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवावाच लागेल –
भारतीय संघाचे सहा सामने अद्याप शिल्लक आहेत. त्यापैकी तीन संघाकडून टीम इंडियाला मोठी टक्कर मिळणार आहे. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असणारा न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन बलाढ्य संघासोबत टीम इंडियाची कसोटी असणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लढत होणार आहे. 29 ऑक्टोबरला गतविजेत्या इंग्लंडशी दोन हात करणार आहे. तर 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकासोबत भारताचा मुकाबला आहे. हे तिन्ही सामने भारतासाठी महत्वाचे आहेत. बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड या तिन्ही संघासोबत भारतीय संघाला विजय मिळवावाच लागेल. तिन्ही पैकी एका संघाने जरी उलटफेर केला तर भारतीय संघाचे विश्वचषकातील गणित बिघडणार आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या तीन सामन्यापैकी दोन सामन्यात तरी भारताला विजय गरजेचा आहे.
भारतासोबत सेमीफायनलची दार कोण ठोठावतेय ?
गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणारा न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी सेमीफायनलसाठी मजबूत दावेदारी दाखवली आहे. न्यूझीलंड संघ सध्या तीन सामन्यात सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका संघ दोन विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. आज दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात सामना आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर ते पहिल्या स्थानावर जाऊ शकतात. पाकिस्तान, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यापैकी एक संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो.