
भिवंडी, कोपरगाव – बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सुरू असलेल्या कामादरम्यान खोदण्यात आलेल्या असुरक्षित खड्ड्यात पडून 12 वर्षीय देवव्रत जुगेश पांडे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दुर्घटना घडली तेव्हा संबंधित खड्ड्याभोवती कोणतेही सुरक्षात्मक कठडे किंवा इशारे नव्हते. मात्र, घटनेनंतर तातडीने बॅरिकेट्स व सूचना फलक लावण्यात आले, ज्यामुळे कंपनीच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या अपघातास जबाबदार असलेल्या एल अँड टी कंपनी प्रशासनावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
खासदार बाळ्या मामा यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून योग्य ती चौकशी आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली.
या दुर्घटनेनंतर स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, नागरिकांनी अशा गंभीर प्रकल्पांच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा आणि दक्षता ठेवण्याची मागणी केली आहे.
Star Apex News Portal या हृदयद्रावक घटनेत मृत पावलेल्या देवव्रतच्या परिवाराबद्दल शोक व्यक्त करतो आणि संबंधित यंत्रणांनी योग्य ती जबाबदारी स्वीकारून कडक पावले उचलावीत, हीच अपेक्षा व्यक्त करतो.