News

चंद्रपूर शहरालगत वाघांचा मुक्तसंचार.

21Views

चंद्रपूर:-

 

 

शहरालगत असणाऱ्या महाऔष्णिक वीज केंद्र वसाहत मार्गावर वाघांचा मुक्तसंचार दिसत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वर्दळीच्या मार्गावर तीन बछड्यांसह वाघिणीच्या संचारासह आतापर्यंत दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान, पाण्याचे मुबलक स्रोत आणि घनदाट झाडींमुळे वाघाने या भागात बस्तान मांडल्याचे समोर आले आहे.

चंद्रपूर शहरालगत वाघांचा मुक्तसंचार बघायला मिळतो आहे. आशियातील सर्वात मोठे वीजनिर्मिती केंद्र शहराच्या शेजारी आहे. इरई धरण आणि ताडोबा जंगलाला जोडून असलेल्या या वीजकेंद्र परिसरात वाघांचा नेहमी वावर असतो. मात्र वीजकेंद्र कर्मचारी वसाहत असलेल्या भागात वाघांचे असे दर्शन नागरिकांत दर्शन निर्माण करणारे ठरत आहे. अगदी वर्दळीच्या मार्गावर रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास वाघीण आणि तिचे तीन बछडे आढळून आल्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. आपल्या बछड्यांना वाचविण्यासाठी वाघीण बाईकस्वारावर चाल करून गेल्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे. यापूर्वी शनिवारी छोटा नागपूर-विचोडा मार्गावरील नाल्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन झाले होते. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

परिसर स्वच्छ करण्याची वनविभागाची सूचना

पाण्याचे मुबलक स्रोत आणि घनदाट झाडीमुळे वीजकेंद्र आणि वसाहत परिसरात वाघाचा वावर वाढला आहे. वीजकेंद्र प्रशासन आणि वनविभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मोठे नाले, बाभळीचे बन आणि इतर झाडांचे आच्छादन या भागात वाघ-बिबटे-अस्वल यासारख्या वन्यप्राण्यांसाठी आश्रयस्थान बनले आहे. आपली पिलं वाढविण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित जागा हवी असताना वाघीण अशी जागा निवडते. यावरून या भागाचे महत्त्व लक्षात येते. परिसरात वनविभागाची गस्त वाढविण्यात आली आहे. सदर भाग चंद्रपूर वीजकेंद्राच्या अखत्यारीत येत असून तो परिसर स्वच्छ करण्याची सूचना वनविभागाने केली आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply