News

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना आरोग्य कवच.

26Views

नाशिक :-

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांच्या मृत्यूची गंभीर दखल आदिवासी विभागाने घेतली असून, ५०२ आश्रमशाळांधील विद्यार्थ्यांचे हेल्थकार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागाच्या या मदतीला बीव्हीजी ग्रुप आणि अमेय लाइफ या दोन संस्था धावून आल्या असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य पालकत्व या संस्थांनी घेतले आहे.

दुर्गम भागातील ३०१ आश्रमशाळांमधील मुलांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी बीव्हीजी ग्रुपने ४८ अॅम्बुलन्स उपलब्ध करून दिल्या आहेत, तर २०१ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य सुविधा देण्याचा विडा अमेय लाइफ संस्थेने उचलला आहे. या सर्व ५०२ आश्रमशाळामंध्ये चोवीस तास आरोग्यसेवेसाठी टोल फ्री नंबर उपलब्ध करण्यात आला असून, त्यासाठी कमांड कंट्रोल युनिट नाशिकमध्ये उभारले जात आहे. या निर्णयामुळे दोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना आरोग्यसेवेचे कवच लाभणार आहे.

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमध्ये योग्य उपचाराअभावी व शाळेतील असुविधांमुळे दरवर्षी साधारण ४० ते ५० विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे याबाबत थेट मुंबई हायकोर्टानेच सरकारला कडक दिशानिर्देश दिले होते. त्यामुळे राज्य सरकारने डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्या समितीने आश्रमशाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी शिफारशी केल्या होत्या. त्यात आश्रमशाळांची स्थिती सुधारण्यासाठी आरोग्य व वैद्यकीय सेवेवर भर देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आदिवासी विभागाने या विषयाला आता चालना दिली असून, शासकीय ५०२ आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना आरोग्यसेवेचे कवच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खासगी संस्थांची मदत घेतली असून, वैद्यकीय क्षेत्रात मोफत काम करणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती हनुमंतराव गायकवाड यांच्या बीव्हीजी ग्रुपने पुढाकार घेतला आहे. या ग्रुपने दुर्गम भागातील ३०१ आश्रमशाळांसाठी १०८ क्रमांकाच्या ४८ अॅम्बुलन्स उपलब्ध करून दिल्या आहेत, तर अमेय लाइफ या संस्थेने उर्वरित २०१ शाळांसह सहा एकलव्य निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य पालकत्व स्वीकारले आहे. या सर्व दोन लाख विद्यार्थ्यांना हेल्थकार्ड दिले जाणार असून, या कार्डाद्वारे मुलांच्या आरोग्यांचा तपशील रोज गोळा केला जाणार आहे. प्रत्येक आश्रमशाळेत सीक रूम तयार करण्यात येणार असून, त्यांच्या आरोग्यावर दर आठवड्याला वॉच ठेवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे.

टोल फ्री क्रमांक

आपत्कालीन परिस्थितीत मदत अथवा सेवेसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे परिसरात बोर्ड लावले असून, तक्रार दाखल करण्यासाठी १८००२६७०००७ हा टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. या नंबरवर चोवीस तास सेवा मिळणार आहे. यासाठी नाशिकमध्ये कमांड कंट्रोल युनिट सुरू केले जात आहे. या युनिटमधून ५०२ आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपचाराअभावी दुर्दैवी वेळ येऊ नये यासाठी विभागाने पुढाकार घेऊन हा प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर येईल. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य कवच उपलब्ध होईल.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply