News

अखेर आमगाव खुर्दचा सालेकसा नगरपंचायतमध्ये समावेश.

18Views

गोंदिया:-

सालेकसा तालुक्यातील एकमेव सालेकसा नगरपंचायतीच्या स्थापनेपासूनच आमगाव खुर्द ग्रामपंचातचा समावेश या नगरपंचायत क्षेत्रात करण्याबाबत वाद सुरू झाला होता. आता आमगाव खुर्द ग्रामपंचायतचा समावेश सालेकसा नगरपंचायतीत करण्यात आल्याने हा वाद कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या या शासननिर्णयानुसार आता आमगाव खुर्द गावाचे सर्व कारभार सालेकसा नगरपंचायतमधून होतील.

सालेकसा नावाने असणारे सर्व शासकीय कार्यालये जसे रेल्वेस्थानक, बसस्थानक, पोलिस ठाणे, बाजारपेठ, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, शाळा महाविद्यालय व इतर शासकीय व निमशासकीय कार्यालये ही आमगाव खुर्द ग्राम पंचायतीच्या हद्दीत असल्याने या ग्रामपंचायतीचा समावेश सालेकसा नगरपंचायतमध्ये करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यासाठी शासनादेश असूनही राजकीय दबावाखाली विलीनीकरण होत नसल्याचे बघून गावकऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. ब्रजभूषण बैस, वासुदेव चुटे यांनी जनहित याचिका सादर करीत ग्रामपंचायतीचा समावेश नगरपंचायतमध्ये करण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या विलीनीकरण धोरणाला न जुमानता ग्रामपंचायत निवडणूक व नगरपंचायत निवडणूकही घेण्यात आली. त्यावर वेळोवेळी बहिष्काराचे हत्यार वापरून ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. लोकप्रतिनिधींना गावबंदी घालण्यासह बेमुदत उपोषण, साखळी उपोषण असे विविध आंदोलनांच्या माध्यमातून विरोध केला होता.

१२ आगस्ट २०१५ रोजी ब्रजभूषण बैस यांनी ग्रामपंचायतीला अर्ज करून ग्रामसभेला हा विषय घेण्यास आग्रह केला. त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रस्ताव पारित करून २० ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. सुनवाणीदरम्यान न्यायालयाने शासनाला खडसावून विलीनीकरणाचे आदेश दिले होते. मात्र, शासनाकडून काहीही कार्यवाही न करता सालेकसा नगरपंचायतची निवडणूक घेण्याचे निर्णय शासनाने घेतला होता. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची अवमानना असल्याचे पुढे करून अवमानना याचिका दाखल केली होती. त्यानंतरही न्यायालयाच्या आदेशाचा पुन्हा अवमान करीत आमगाव खुर्द ग्रामपंचायतची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. याचिकाकर्त्यांनी ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पुन्हा याचिका दाखल करीत शासनाला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडले. शेवटी बुधवारी न्यायालयीन लढ्याला यश मिळाल्याने आमगाव खुर्द ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

निवडणुकीबद्दल संभ्रम

आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगरपंचायतमध्ये समावेश झाला असला तरी, नवीन विलीन झालेल्या भागाचे प्रभाग तयार करून तेथे निवडणूक होईल काय, किंवा जुनी सर्व पदे रिक्त करून नव्याने निवडणूक होईल का, याबाबत शासननिर्णयात कसलाही उल्लेख नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ‘ही याचिका दाखल केल्यापासून गावकऱ्यांची साथ मिळाली. पण, काहींच्या रोषालाही सामोरे जावे लागले. हा कुणा एकट्याचा विजय नसून संपूर्ण गावाचा विजय आहे.’, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते ब्रजभूषण बैस यांनी व्यक्त केली. तर, ‘आमगाव खुर्दसारख्या सक्षम ग्रामपंचायतीला सालेकसा नगरपंचायतमध्ये समाविष्ट करून सालेकसा येथील जनतेवर अन्याय करण्यात आला आहे. या निर्णयाने शासनाने जनतेवर आणि जनप्रतिनिधींवर अन्याय केला आहे. त्यामुळे आधीपासून दुर्गम असलेल्या गावांचा विकास खुंटेल’, अशी प्रतिक्रिया सालेकसाचे नगराध्यक्ष वीरेंद्र उईके यांनी व्यक्त केली.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply